
जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२४
दोन दिवसापुर्वीच कालिका माता परिसरात डंपरच्या भिषण अपघातात बालक चिरडल्याची घटना घडल्यानंतर महसुलच्या पथकाने जळगाव शहरासह तालुक्यातील खेडी, फुफनगरी, गाढोदे येथे अवैध वाळू साठ्यांवर कारवाई केली आहे. अंदाजे ४० ते ५० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा करून पुढील लिलाव कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर वाढते अपघात त्यातच अवैध वाळूच्या डंपरने एका बालकास चिरडल्याची घटना घडल्यानंतर महसुलचे पथकाने तालुक्यात कारवाईचा धडका सुरू केला आहे. महसुलच्या पथकाने आज खेडी, फुफनगरी, गाढोदा येथे ठिकठिकाणी असलेल्या वाळू साठ्यांवर कारवाई करत साठे जप्त केले आहे. तसेच जळगाव शहरात देखील बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी पडलेला वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. शहरात रामदास कॉलनी, सेंट्रल बँक कॉलनी भागात कारवाई करत आजच्या कारवाईत साधारणतः ४० ते ५० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.
झोपेचे सोंग घेतलेले महसूल प्रशासन झाले जागे !
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूमाफियाचा धिंगाणा सुरु होता. मात्र महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतले होते मात्र जळगाव शहरातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु झाल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले महसूल प्रशासन जागे होवून कारवाई करू लागले आहे.