जळगाव मिरर | ११ मार्च २०२४
कोरोना काळात राज्यभर चर्चेत आलेले अजित पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आ.निलेश लंके आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार नीलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नीलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
नीलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थित सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडून नगर दक्षिणमधून लंके यांची उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, खा.सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार नीलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण शहरात दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.