जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना एक एक उमेदवार जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो, अशी जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यामुळे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे बोललं जात आहे.
नुकतंच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील चाकण नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा चाकण नगरीत पार पडला. या मेळाव्यात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच मेळाव्यात अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांचे विधानसभेतील कामाचे कौतुक केले.
“मी आज उमेदवार जाहीर करणार नाही, नाहीतर आमच्या महायुतीतील लोक म्हणायचे, हा बाबा तर जागाच जाहीर करायला लागलाय. अजून कुठली जागा जाहीर झालेली नाही. पण राष्ट्रवादीला महायुतीच्या वतीने जागा मिळाली, तर सगळ्यांचा कल कार्यसम्राट आमदार दिलीप मोहिते पाटलांना असावा. त्यांना अजून एक संधी द्यावी आणि तुमच्या मनातलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल. तसेच जी गाडी सरपंचापासून आमदारापर्यंत थांबली ती पुढे जरा दिव्यापर्यंत पोहोचली पाहिजे”, असे अजित पवारांनी म्हटले.