जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६
जळगाव महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीत महायुतीच्या सत्तेचा गुलाल अजून हवेतच असताना, नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांच्या समोरच विकासकामांचे ‘रिमांड’ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या चेंबरमध्ये पाऊल ठेवताच, त्यांच्याच पक्षाच्या प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी समस्यांचे भलेमोठे निवेदन थेट त्यांच्या हातात दिले आहे.
महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन होताच, प्रलंबित विकासकामांचा डोंगर आता सत्ताधाऱ्यांसमोर उभा राहू लागला आहे. प्रभाग १३ मधील प्रशासकीय काळातील दुर्लक्ष, अकार्यक्षमता आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा नगरसेविका वैशाली पाटील यांनी आपल्या निवेदनात मांडला आहे. “प्रशासक असताना आमचे कोणी ऐकले नाही, आता तरी आमच्या प्रभागाकडे लक्ष द्या,” असा स्पष्ट इशाराच या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात प्रभागातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. स्वच्छता विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून, घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने कचरा संकलनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. तसेच नवीन रस्ते, गटारी, ओपन स्पेसचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे गेल्या वर्षभरापासून रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
केवळ निवेदनावर न थांबता, नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत प्रभाग १३ मधील सर्व संबंधित अधिकारी व मक्तेदारांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याची मागणी केली आहे. या बैठकीला प्रभागातील नगरसेवक नितीन सपके, सौ. सुरेखा तायडे आणि प्रफुल्ल देवकर उपस्थित राहून प्रलंबित कामांचा थेट जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरपदाची सूत्रे हाती घेतानाच सत्ताधारी पक्षातील नगरसेविकेनेच प्रशासनासमोर प्रश्नांची सरबत्ती केल्याने, आगामी काळात महापालिकेतील कामकाजावर अधिक दबाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.




















