अमळनेर : विक्की उत्तम जाधव
भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाही रात्रीं दिवस, वाट तुझी, संत तुकाराम महाराजांच्या या ओव्यांप्रमाणे आज दि २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात आकर्षक फुल, फळांचा देखावा साकारण्यात आला होता. विठू नामाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळ ग्रह मंदिरात मंगळ देवाला विठुरायाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसेच संपूर्ण मंदिर विविध फुले व फळांनी सजविण्यात आले होते. मंदिरातील विश्वस्त आणि सेवेकर्यांनी सकाळी विठू नामाच्या गजराचा जयघोष करीत मंगल दिंडी काढली. टाळ,मृदंगाच्या गजरात विठू नामाचे नामस्मरण करीत नृत्य केले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सर्व सेवेकर्यांनी दिंडीत सहभाग घेत विठू नामाचा गजर केला.