जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४
राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना २ नोव्हेंबर रोजी रात्री जळगाव शहरातील निवृत्ती नगरात वेदांत पंकज नाले (वय १४) या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेतला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (४ नोव्हेंबर) त्याचा मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेतल्याने नाले कुटुंबाला धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय असलेले पंकज नाले हे निवृत्तीनगरात कुटुंबासह राहतात. त्यांना वेदांत हा एकुलता एक मुलगा. शनिवारी रात्री दिवाळी पाडवा सण साजरा होण्यासह सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना वेदांतने राहत्या घरामध्ये स्कार्पने गळफास घेतला. रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास त्याच्या आईला मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली.