जळगाव मिरर | ५ जुलै २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य (दवाखाना) विभागात मनपा आयुक्तांची दिशाभूल करून एका कर्मचाऱ्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गंत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या सहीने देण्यात आली. परंतु प्रकरण अंगाशी येईल हे समजल्यावर एका खासगी मक्तेदारामार्फत सफाई कामगाराची त्या कर्मचाऱ्याला ऑर्डर तयार करून देण्यात आली.
संबधित डाटा एन्ट्री ऑपरेटरला एप्रिल महिन्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गंत नियुक्तीचे आदेश डॉ. विजय घोलप यांनी दिले होते. त्यानंतर दोन महिने काम केल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गंत वेतन अदा करता येणार नाही, असे पद भरता येणार नाही, असे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या शहर लेखा व्यवस्थापक यांनी सांगितल्यावर डॉ. विजय घोलप यांनी जि.प.अंतर्गत नियुक्त मक्तेदार स्वामी सर्व्हिसेस पुणे यांच्याकडून मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रात त्या कर्मचाऱ्याला सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीचे आदेश मिळवून दिले. हा आदेश १४ जून रोजी त्या कर्मचाऱ्याला मिळाला आहे. मात्र, ज्या पदावर त्या कर्मचाऱ्याला आता नियुक्ती आदेश मिळाला त्या ठिकाणी काम न करता संबधित कर्मचाऱ्याला मनपाच्या शाहु महाराज रुग्णालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर काम करण्याच्या तोंडी सुचना डॉ. विजय घोलप यांनी दिल्या आहेत. त्यामुळे डॉ. घोलप यांच्याकडून दवाखाना विभागात मनमानी पध्दतीने कारभार केला जात असल्याचे उघड झाले आहे.
