जळगाव मिरर | ८ जून २०२६
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात राबविली. जळगाव जिल्ह्यात पार पडलेल्या स्पर्धेला युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला. महावीर क्लासेस जळगाव येथे उत्साहात स्पर्धा पार पडली.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी शिवसेना जळगाव जिल्हा संघटक गजानन मालपुरे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. सडेतोड वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र २०५०’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण : यवकांची भमिका’ असे दोन विषय देण्यात आले होते. दोन्हीही विषयांवर स्पर्धेकांनी या हक्काच्या व्यासपीठावर उत्स्फूर्त विचार मांडले. स्पर्धेसाठी प्रथम सन्मानचिन्ह, द्वितीय सन्मानचिन्ह तृतीय सन्मानचिन्ह आणि दोन उत्तेजनार्थ अशा स्वरूपात बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्रथम पारितोषिक रुपाली वडनेरे, द्वितीय पारितोषिक अंकित कासार, आणि तृतीय क्रमांक सुमित खरे यांनी पटकविले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा.रामचंद्र पाटील आणि सरिता खचणे यांनी केले. येत्या १० जूनला या स्पर्धेची विभागीय फेरी पार पडणार असून, पहिले तीनही विजेते यामध्ये सहभागी होणार आहेत. विभागीय फेरीतील तीन विजेते १४ जूनला मुंबई येथे शिवसेनाभवन येथील अंतिम फेरीत सहभागी होतील. प्राथमिक फेरीच्या पारितोषिक वितरणप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हासंघटक गजानन मालपुरे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हायुवाधिकारी तथा धरणगावचे माजी नगरअध्यक्ष निलेश चौधरी, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.



















