जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. याचा आता पोलिसांनी उलगडा केला असून यातील संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात होता. त्याच कारणावरुन अनेकदा संशयित अर्जुन नरसिंग भिल (वय ४०, रा. माफिपालीया जि. बऱ्हाणपुर, ह. मु. ऐनपूर ता. रावेर) याने मयत अफजल याला समजावले होते. परंतू तो ऐकत नसल्याने त्याला शेतात जाण्यापुर्वी बांबूने बेदम मारहाणीत तो मयत झाला. या खूनातील संशयिताच्या मध्यप्रदेश येथून एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळून खूनाचा उलगडा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपुर गावात अफजल या नामक इसमाचा खून झाल्याची घटना घडली होती. या खूनाचा उलगडा करण्यासाठी निंभोरा पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत होते. घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्या आधारावर व तांत्रिक विश्लेषणावरुन हा खून संशयित मारेकरी अर्जुन भिल (बारेला) याच्या पत्नीचे आणि मयत अफजल याच्यासोबत अनैतिक संबंध होते. अर्जुनने अफजल याला तू रिकामे धंदे करु नको म्हणून समजावून सांगितले होते. परंतू तो ऐकत नसल्याने त्याचा राग हा अर्जुनच्या मनात होता. त्यामुळे अर्जुनने अफजल याला त्याच्या शेताकडे बोलावले. गायरान रस्त्याने अफजल हा शेताकडे जात असतांना दबा धरुन बसलेल्या अर्जुनने टोकरने अफजलच्या डोक्यावर वार करुन त्याचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर संशयित अर्जुन हा त्याच दिवशी दुपारी पत्नीला घेवून मध्यप्रदेश येथे गेल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथक सलग चार दिवस वेश बदलून पाड्यावर दबा धरुन बसले होते. दरम्यान, अर्जुन हा त्याठिकाणी आला असता, पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला खाक्या दाखविताच त्याने खूनाची कबुली दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, दीपक पाटील, नितीन बाविस्कर, संदीप सावळे, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, राहूल बैसाणे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भारत पाटील यांच्या पथकाने केली.