जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात गोंधळ उडालेला आहे. आरोपीच्या अयोग्य कृत्याचा निषेध करत बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा विरोध प्रदर्शन केला. या घटनेने राज्यभर असंतोष व्यक्त केला आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत बदलापूरमधील अत्याचाराच्या प्रकरणावर चर्चा झाली आणि त्यानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचा सहभाग असणार आहे. बदलापूरमधील या घटनेच्या विरोधात पुणे, जळगाव आणि सांगलीत मोठे आंदोलन झाले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात तसेच बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आवाज उठवण्यात आला. सांगलीतही राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. ठाकरे गटाने देखील आपल्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलपत्राला नकार
कल्याण वकील संघटनेने स्पष्ट केले आहे की, त्यांनी आरोपीच्या वकिलपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वकील संघटनेने असा निर्णय घेतला आहे की, त्यांनी आरोपीसाठी वकीलपत्र द्यायचे नाही. सरकारने आरोपीसाठी वकील नियुक्त करावा आणि त्यांनी आरोपीच्या विरोधात केस लढवावी, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या चुकीमुळे आंदोलन उफाळले असल्याचे देखील संघटनेने म्हटले आहे.