
चाळीसगाव : कल्पेश महाले
चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील शुभम अरूण पाटील (वय २६) या तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत गावातीलच एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. या मागणीसाठी मृत तरुणाचे नातेवाईकांसह रयत सेना व भाजपने शहर पोलिस स्टेशन समोर ठिय्या देत आंदोलन केले. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुभम पाटील याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तमगव्हान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मृत शुभम याचे वडिल अरूण पाटील यांचे पॅनल व संजय सानप याचे पॅनल समोरासमेार ठाकले होते. त्यात अरूण पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली.त्यामुळे लक्ष्मण उर्फ संजय आनंदा सानप हा राजकिय द्वेशातुन सतत अरुण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत होता. असा आरोप कुटुंबीयांनी केला.
३० रोजी सकाळी ८.३० वाजेचे सुमारास शुभम हा कुणाला काहीएक न सांगता घरातून बाहेर निघून गेला. दुपार पर्यंत तो घरी न परतल्याने त्याचा गावात शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. दुपारी ४ वाजेचे सुमारास एकाने रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याचे कळाले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. शुभम यास आत्महत्येस प्रवृत्त लक्ष्मण उर्फ संजय आनंदा सानप यानेच केल्याने त्यास अटक करण्याची मागणीसाठी भाजपचे शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील व पदाधिकारी तसेच रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व पदाधिकारी यांच्यासह माजी सरपंच किशोर पाटील, सरपंच धनराज पाटील, तमगव्हाण येथील ग्रामस्थ नातेवाइकांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन गाठत २ तास धरणे आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या समक्ष, पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुभम पाटील याच्यावर अंत्यसंस्कार केले.





















