जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शेंदुर्णी व मेडेव्हिजन जळगांव यांच्यातर्फे आषाढी एकादशी निमित्त शेंदुर्णी येथील प्रति-पंढरपूर त्रिविक्रम मंदिर परिसरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जळगांव येथे शिक्षण घेत असणाऱ्या १०५ विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा दिली.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उत्तम थोरात व गोविंद अग्रवाल यांनी शेंदुर्णीचा सांस्कृतिक व ऐतिहासिक परिचय व प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे यांनी मेडेव्हिजनचा कार्याचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला. या प्रसंगी मेडेव्हिजन प्रदेश संयोजक श्रेया स्वामी,विभाग संयोजक भविन पाटील व शहरमंत्री गणेश जाधव हे देखिल मंचावर उपस्थित होते.
विठ्ठलरूपी त्रिविक्रम भगवानचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक-भक्त आषाढी एकादशी निमित्त शेंदुर्णीत येतात. या भक्तांसाठी मंदिर परिसरातील ५ ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.
“पोलीस मित्र” अभियान
या वेळी गर्दी व्यस्थापनासाठी अभाविप शेंदुर्णीतर्फे “पोलिस मित्र” अभियान देखील राबविण्यात आले. शेंदुर्णी शाखेचे ६० कार्यकर्ते पोलिस मित्र म्हणून या अभियानात सहभागी होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विभाग संगठनमंत्री धनंजय शेरकर,विभाग संयोजक भावीन पाटील,गणेश जाधव,कुणाल पाटील,चिन्मय मुळे व अन्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न घेतले.