जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांसह निवडणुकीशी संबंधित सर्वच भागिदारांशी झालेल्या चर्चेचा संक्षिप्त तपशील सांगितला. तसेच निवडणुकीची प्रक्रिया विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी पार पाडण्याचे संकेतही दिले. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर आज विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक तथा इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकीसंबंधीची मते जाणून घेतली. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या दौऱ्याचा तपशील सादर केला.
राजीव कुमार म्हणाले, आम्ही दोन दिवस विविध राजकीय पक्षांसह सर्वच भागिदारांशी चर्चा केली. त्यात सर्वच पक्षांनी दीपावली, देव दिवाळी व छटपूजेसारखे सणवार लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवण्याचीही सूचना केली. त्यांची ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, निवडणुकीची तारीख आठवड्याच्या शेवटी ठेवल्यामुळे शहरी भागातील मतदार सुट्ट्यांचा मेळ साधून शहराबाहेर जातात. त्याचा फटका निवडणुकीच्या टक्केवारीला बसतो. त्यामुळे मतदानाची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवली जावी अशी त्यांची विनंती होती, असे राजीव कुमार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांची तासंतास ताटकळत उभे राहण्यासारखी गैरसोय झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचनाही काही पक्षांनी केली. आयोग यासंबंधी खुर्च्या उपलब्ध करून देण्यावर विचार करेल. काही पक्षांनी निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या तटस्थपणे करण्यावर जोर दिला. काहींनी पैशांच्या गैरवापराकडेही लक्ष वेधले. विशेषतः काही पक्षांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना दूरच्या मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यात येणाऱ्या अडचणींवर योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारा पोलिंग एजंट त्याच बूथवरील असावा असा आग्रहीही काही पक्षांनी धरला. निवडणूक आयोग यावरही योग्य तो निर्णय घेईल.
निवडणुकीच्या काळात फेक न्यूजची मोठी समस्या असते. त्यावरही काही पक्षांनी चिंता व्यक्त केली, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
राजीव कुमार यांनी यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची संख्या व इतर आकडेवारी सांगितली. ते म्हणाले, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यापैकी 25 मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी पार पाडली जाईल.