जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२४
दुकानात दिवसभर झालेल्या व्यवहाराची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुकान बंद करुन व्यापारी घरी जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यात लघुशंकेला गेल्याने चोरट्याने त्यांच्या डिक्कीतून दीड लाखांची रोकड लांबवली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास दाणाबाजारात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरात सुरेशकुमार गवालदास मेघानी (वय ६५) हे वास्तव्यास असून त्यांचे दाणाबाजारात ड्रायफ्रुटचे दुकान आहे. गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकान बंद करून दुकानातील दीड लाखाची रोकड, चार डायऱ्या व चेक बुक व इतर कागदपत्रे कापडी पिशवित ठेवून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. ते त्यांच्या दुसऱ्या दुकानाजवळ गेले. याठिकाणी दुचाकी उभी करून लघुशंकेसाठी दुकानाच्या मागे गेले. परत आल्यावर त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली व त्यातील रोख दीड लाख रुपये व इतर कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.