जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
राज्यात बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जनमानसात प्रचंड संताप असताना नुकतेच नाशिकमध्ये मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळखोराना जबर चोप देत त्यांची मस्ती उतरवली. शिवशक्ती चौकाजवळील डॉ. हेडगेवार चौकात बुधवारी २८ ऑगस्ट दुपारी हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पाेलिसांनी चार टवाळखाेरांना जेरबंद केले अाहे. त्यातील एक अल्पवयीन आहे. या घटनेची क्लिप गुरुवारी २९ ऑगस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिककर महिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवननगर भागातील महिला हेडगेवार चाैकातील मनपा रुग्णालयात येत होती. त्या वेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखाेरांनी या महिलेची छेड काढली. महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा हा प्रकार घडल्याने तिचा संताप अनावर झाला. तिने मागे फिरून टवाळाला विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतक्यात या महिलेची मुलगी व मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या. टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचे पाहून लेकीने थेट टवाळखोराच्या कानशिलात लगावली. बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून टवाळखोराला चोपून काढले. रणरागिणींचा रुद्रावतार पाहून टवाळांनी तेथून पळ काढला.