
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे.
योजनेत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. गत अनेक दिवसांपासून महिलांच्या वर्गातून फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित होता. यासंदर्भातील सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता प्रत्यक्ष रक्कम लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पुढील २-३ दिवसांत त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होईल. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली योजनेची वाटचाल सतत प्रगतीशील राहील, असा माझा विश्वास आहे.”
या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण करण्याचा सरकारचा उद्देश आहे. राज्यभरातील लाखो पात्र महिला या निधीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य व आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गक्रमण करतील, अशी अपेक्षा आहे.






















