जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४
भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिण बाजूस असलेल्या मुसाफिर खाण्यामध्ये लगेज स्कॅनर मशीन तपासणी केंद्राजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याची बॅग तपासण्यात आली. या बॅगेत तब्बल १ लाख ७० हजाराचा ९ पाकिटात गांजा आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूस असलेल्या मुसाफिर खाण्यामध्ये लगेज स्कॅनर मशीन तपासणी केंद्राजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे हेड कॉन्स्टेबल जोगिंदर नेरपगार व एमएसएफ कर्मचारी दीपक वसंत बाविस्कर यांना एका प्रवाशावर संशय आला. या वेळी त्याच्याजवळील असलेल्या २ बॅगाची तपासणी करताना संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा स्क्रीनवर आढळला. यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी संशयित व्यक्तीची चौकशी सुरु केली. याचवेळी व्यक्तीने गर्दीचा लाभ उठत तो व्यक्ती घटनास्थळावरून बसस्थानकाच्या बाजूने शहर परिसरात पळाला. या घटनेची माहिती हेडकॉन्स्टेबल जोगेंद्र नेरपगार यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाचे आरपीएफ निरीक्षक पी. आर. मीणा यांना फोनवरून कळवली. त्यानंतर भुसावळ स्थानकाचे निरीक्षक मीना हेड कॉन्स्टेबल मिलिंद वानखेडे, सीपीडीएस टीमचे कॉन्स्टेबल भूषण पाटील व कॉन्स्टेबल महेंद्र कुशवाह हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर केलेल्या पाहणीत दोन्ही बॅगमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आला.
ही माहिती भुसावळ मंडळाचे रेल्वे सुरक्षा बल सहायक आयुक्त अशोक कुमार यांना मिळताच त्यांनी दोन्ही बॅग पंचासमोर तपासल्या. या दोन्ही बॅगेमध्ये ९ बंडल सापडले. या बंडलमध्ये ओला गांजाचे बियाणे आढळले. या नऊ बंडलमध्ये सापडलेल्या गांजाचे वजन १७ किलो असून त्यांची बाजार भावात अंदाजे १ लाख ७० हजार किंमत आहे. हा गांजा गुरुवारी पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.