जळगाव मिरर | ११ जून २०२५
राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी परिसरात त्यांनी 8 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून, बच्चू कडूंची प्रकृती आता खालावली आहे. अशातच आरोग्य विभागाच्या पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी करण्यात आली.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून. त्यांचे वजन ४ किलोने कमी झाले आहे, तर रक्तदाब वाढलेला आहे. तीवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची तपासणी करण्यात आली आहे. आपल्या मागण्यांवर ते ठाम असून अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
बच्चू कडू यांचे हे आंदोलन शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि मोठ्या संख्येने समर्थकांच्या सहभागामुळे सरकारवर दबाव वाढत असून, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन राजकीयदृष्ट्या देखील महत्चाचे मानले जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी देखील त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
मी पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो. जो शेतकरी जाती धर्मामध्ये विभागलेला आहे. पण त्याने शेतकरी म्हणून जगावं, त्याचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे कडू म्हणाले. मंत्री असतानाही शेतकऱ्यांचा आवाज उचलला, असेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे, रोहित पवार त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. या आंदोलनाचे राज्यात परिणाम उमटले पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री साहेब रोज आत्महत्या होत आहेत. मंदिरात जरी तुम्ही पुण्य कमावलं असेल पण या राज्यात आत्महत्या झालेल्याचे पाप कुठं फेडणार, असा सवालही बच्चू कडू सरकारला विचारला आहे.
