जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२५
राज्यातील मुंबई येथील ईडी कार्यालयाबाहेरील आंदोलनावेळी काँग्रसच्या खासदार वर्षा गायकवाड जखमी झाल्या आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या झटापटीमध्ये वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वर्षा गायकवाड यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या विरोधात काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहेत. तर मुंबई काँग्रेसच्या वतीने देखील मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या दरम्यान ही घटना घडली आहे.
या संदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या राजकीय हेतूने प्रेरित आरोपपत्राविरुद्ध मुंबई काँग्रेसच्या वतीने शांततेत निदर्शने करत होते, परंतु मुंबई पोलिसांनी आम्हाला निदर्शने करू दिली नाही. इतर कार्यकर्त्यांसह माझ्यावरही मारहाण करण्यात आली आणि आम्हाला अलोकतांत्रिक पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. भाजपला माहित आहे की काँग्रेस हा या देशात लोकशाहीचे समर्थन करणारा आणि लोकांच्या हक्कांसाठी लढणारा एकमेव पक्ष आहे. त्यांना राहुल गांधींच्या लोकप्रियतेची भीती आहे. काँग्रेस ही त्यांच्या फॅसिस्ट कारस्थानांविरुद्ध उभी असलेली एकमेव शक्ती आहे आणि म्हणूनच ते खोटे खटले दाखल करून धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही झुकणार नाही. आम्ही जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवत राहू, अशा इशारा या वेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.