
जळगाव मिरर | १३ मे २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक भागात शिवसेना ठाकरे गटाला सोडून अनेक नेते शिंदेंच्या पक्षात जात असतांना आता उत्तर मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मृत अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत. स्थानिक नेतृत्वातील नाराजीमधून त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे कुटुंबासोबत तेजस्वी घोसाळकर यांचे चांगले संबंध आहेत, परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्यावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते. या पूर्वी देखील तेजस्वी यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती, परंतु पक्षाकडून दखल न घेतल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी यांना मातोश्रीवर भेटीसाठी बोलावण्यात आले आहे. राजीनामा देण्याचे कारण व इतर विषयांवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्या म्हणाल्या, मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मनःपूर्वक आभार मानते. माझा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती. तेजस्वी घोसाळकर यांनी हा राजीनामा विभागप्रमुखांकडे व्हॉट्सॲपद्वारे पाठवला असल्याचे समजते.
गेल्या महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. ही धमकी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर आली होती. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी लालचंद यांच्या नावाने धमकीचा मेसेज आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा तो मेसेज होता.