जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
मागील काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मंगळवारी सकाळी या चर्चांनी अधिकच जोर धरला. कारण वसंत मोरे यांनी सोमवारी दि.११ रात्री एक फेसबुक पोस्ट केली. “मर्यादेच्या बाहेर त्रास केल्यानंतर माणूस शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही”, असं देखील वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. त्यांच्या या पोस्टमुळे पुणे मनसेत सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं.
ऐन लोकसभा 2024 निवडणूक तोंडावर आली असताना मनसेला मोठा धक्का बसला. राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडवत करत पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट केली. साहेब मला माफ करत, असं म्हणत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेत मोठी खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला? ते कशामुळे नाराज होते? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, वसंत मोरे यांनी स्वत: मनसे सोडण्याचं कारण सांगितलं आहे. पक्षामधील अंतर्गत गोष्टीवरून मी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होतो. याबाबत शहरातील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे माझं नावही सूचवलं होतं. मात्र, वारंवार गैरसमज पसवून माझ्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे, असं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता तुम्ही कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला असता, सध्या मी मनसेला सोडचिठ्ठी दिली असून कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.