जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर जवळील देव्हारी येथून सोयगाव कडे जाणाऱ्या सोयगाव आगाराच्या बसने गोद्री गावाजवळ जामनेरला जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेचे सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव आगाराची देव्हारी मुक्कामी बस क्रं. एमएच २० बीएल २३९३ सकाळी सोयगावकडे मार्गक्रमण करीत असतांना फत्तेपूर गोद्री या प्रमुख जिल्हा मार्गावर दिलीप गायकवाड यांच्या शेताजवळ गोद्रीतांडा येथून जामनेर येथील रुबीस्टार हॉस्पीटलमध्ये नोकरीसाठी दुचाकीवरून निघालेल्या निलेश तुकडसिंग नाईक (वय २८) याला जोरदार धडक दिल्याने त्याचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश फड पो. उपनिरीक्षक आर. के. शेख पो.ना.गणी तडवी पो.काँ. मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत प्रकाश तुकडसिंग नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पो. ठाण्याला भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१,१२५ (अ), १२५ (इ), ४२७ (४) मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी गणेश फड यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक आर. के. शेख करीत आहे.