
जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर आता महायुती स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कंबर कसले आहे. यापूर्वी भाजपचा शिर्डी येथे पदाधिकार्यांचे अधिवेशन झाले. यानिमित्ताने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग शिर्डीतून फुंकले. अधिवेशनाला दहा हजारांहून अधिक पदाधिकारी उपस्थित होेते.
शरद पवार यांनी नेहमीच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे हे विश्वासघातकी राजकारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी 20 फूट गाडले. उद्धव ठाकरे दगाफटका करून मुख्यमंत्री बनले. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे घराणेशाहीला चाप बसला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. या मेळाव्यात अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भाषणे झाली.