जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील एका कालव्यातून माजी मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह पोलिसांनी अखेर जप्त केला आहे. ११ दिवसांपूर्वी गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये पाहुजाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
आरोपी बलराज गिलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मृतदेह जप्त करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गिलला गुरुवारी कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ‘हॉटेल सिटी पॉइंट’ मध्ये घेऊन जात पाच जणांनी पाहुजाची हत्या केली होती. पाहुजा अश्लील छायाचित्राच्या माध्यमातून हॉटेल मालक अभिजित सिंग (वय ५६) ला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. पाहुजाच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी गिलवर टाकण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.