
जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२४
मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डंपर व ट्रॅक्टरद्वारे वाळू तसेच खनिज वाहतूक करण्यात येते. ही वाहन सुसाट वेगाने रस्त्यांवरुन धावत असतात. अशाच एका सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरणे स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील अंतुर्ली येथील दोन्ही सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाट्यापुढे होणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी खामखेडा जवळील खदानीमधून मुरूमाची डंपरद्वारे वाहतूक होत आहे. यामुळे या रस्त्याने डंपरची वर्दळ सरुच असते. पूर्णांकडून मुरूम भरण्यासाठी खामखेडा जवळील खदनीकडे जात असताना डंपर (एमएच १९, सीएक्स- १८६५) ने मुक्ताईनगरकडून अंतुर्लीकडे जाणाऱ्या स्कुटी (एमएच- १९, डीसी- ७९३४) ला जबी धडक दिली. ही घटना २४ रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली. या भीषण अपघातात स्कुटीवरील युवक श्रेयस विजय मुक्ताळकर (वय २३) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर त्यांचा लहान भाऊ मानस विजय मुक्ताळकर (वय १६) याचा दोन ठिकाणी पाय फ्रेंकर झालेला आहे.
अपघातातील दोन्ही जखमी अंतुर्ली येथील रहिवासी असून उपचारासाठी त्यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या गुन्ह्याची नोंद मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून डंपरवरील चालक अरविंद यादव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक विजय पढार करत आहेत.