जळगाव मिरर | २४ जुलै २०२३
राज्यातील पोलीस दलात एक खळबळ माजविणारी बातमी समोर आलेली आहे. पुण्यात व अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला असून त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांची पत्नी मोनी गायकवाड (वय ४४), व पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात राजपेठ विभागाचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. पती-पत्नी पुतण्या आणि दोन मुले असा परिवार बाणेर परिसरात वास्तव्यास होता. गायकवाड हे अमरावती येथे नेमणुकीस असल्याने सुट्टीच्या दिवशी पुण्यात येत होते. दरम्यान शनिवारी रात्री ते पुण्यात आले होते. त्यानंतर राहत्या घरी त्यांनी पत्नी आणि पुतण्याचा गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले. याबाबत चतुर्शिंगी पोलिस तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.