जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या लाचखोरीला लगाम लावण्यासाठी एसीबी कार्यालयाकडे तक्रार होताच लागलीच कारवाई करीत आहे. धरणगाव तालुक्यातील ग्रामसेवकाने लाच घेतल्यानंतर लागलीच दोन दिवसात एका पोलीसाने लाच घेतल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एक पंटरच्या माध्यमातून चार हजारांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिकाकडून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याने ही कारवाई झाली आहे.
वाळूचे ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या अडावदमधील पोलीस कर्मचार्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोसावी व खाजगी पंटर चंद्रकांत कोळी असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत. तक्रारदार यांनी कर्जाद्वारे ट्रॅक्टर घेतले असून वाळू वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न होण्यासाठी गोसावी यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र चार हजारात तडजोड झाल्यानंतर तक्रारीअंती सापळा रचण्यात आला. अडावद पोलीस स्टेशन आवारात खाजगी पंटरने लाच स्वीकारताच गोसावी यांनाही अटक करण्यात आली. एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, ईश्वर धनगर, राकेश दुसाने, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोसावी व कोळी यांच्या विरुद्ध अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.