
जळगाव मिरर | २० मे २०२६
शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने ५ लाखांची लाच घेतल्याची घटना ताजी असताना आता सहकारी संस्थेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तडजोडीनंतर ३ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (वर्ग-१ अधिकारी) यांच्याकडे संबंधित तक्रारदाराविरुद्ध सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशीचा अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या मागणीबाबत तक्रारदाराने १८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, संबंधित अधिकाऱ्याने मागणीची पुष्टी करत अखेर ५ लाखांवरून ३ लाख रुपयांमध्ये तडजोड केल्याचे समोर आले. त्यातील पहिला हप्ता १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
योजनेनुसार २० मे रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती देविदास धनसिंग पाटील यांनी उपनिबंधकांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबी जळगाव पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर,पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, पो. नि. हेमंत नागरे, पोहेकॉ.बाळु मराठे, मपोहेका. संगिता पवार, पो. कॉ. मनोज पाटील व पो.कॉ. सचिन चाटे






















