
जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२४
धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर १२ ते १५ वाळू माफियांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने चांदसरचे तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळ काढला होता. यात तलाठी पाटील हे गंभीर जखमी झाले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर येथे गिरणा नदीचे पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असून ती रोखण्यासाठी धरणगावच्या तहसीलदारांनी एक पथक तयार केले आहे. याच पथकातील चांदर येथील तलाठी दत्तात्रय शांताराम पाटील व त्यांचे ४ सहकारी वाळूचा उपसा रोखण्यासाठी मध्यरात्री २ वाजता गिरणा नदीत उतरले. याची खबर लागताच या पथकावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या वेळी तलाठी पाटील यांनी हा हल्ला परतवला असता वाळू भरणाच्या पावड्याने तलाठी पाटील यांच्या पायाच्या पोटरीवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे यावेळी सोबत असलेले सहकारी जीव वाचवण्याच्या हेतूने पळून गेले. यात तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, १९ डिसेंबरला पहाटे २.१५ धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी केली. दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश ईश्वर कोळी व गावातील इतर १० ते १२ व्यक्ती तसेच ट्रॅक्टर चालक, मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण १२ ते १५ जणांनी महसूल पथकावर हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे धाव घेतली. या वेळी तलाठी पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावडे मारून त्यांचे पायाचे हाड मोडले. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच दुसऱ्या पथकातील धरणगावचे नायब तहसीलदार संदिप विजयसिंग मोरे, नायब तहसीलदार सातपुते, पाळधीचे स.पो.नि.प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी तसेच अन्य ५ तलाठी १५ मिनिटातच नदीपात्रात पोहोचले. तो पर्यंत हल्ला करणारे ट्रॅक्टर घेऊन पळून गेले होते. तर या पथकाला ही गावातील काही लोकांसह महिलांनी अडवले. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे का, हे तपासून अडवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले.