जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याने जिल्ह्यातील अनेक अधिकारी व कर्मचारीना धक्काच बसला आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील वाळूमाफियांची दादागिरी आता थेट शासकीय अधिकाऱ्यावर देखील होत असल्याचे चित्र या घटनेवरून बाहेर आले आहे.
यावल तालुक्यातील वढोदा प्र. गावाजवळ अवैध वाळू नेणारे ट्रॅक्टर अडविले असता महसूल विभागातील एका महिलेशी झटापट केल्याची घटना ३१ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे. ट्रॅक्टर अडवून ही महिला सिटवर बसली असता अन्य आणखी एकाने येऊन तिला खाली ओढल्याने हाताच्या कोपरास मार बसला. एवढेच नाही तर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकीही दिली. लगेचच ट्रॅक्टर पळवून नेले. याबाबत यावल पोलिसात अनोळखी चालक व त्याच्या सोबतचा थोरगव्हाण येथील निलेश समाधान सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.