जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४
खान्देशात गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीर उद्योगाची मालिका सुरु असल्याचे नेहमीच आढळून येत असतांना नुकतेच धुळे स्थानिक गुन्हे शाखेसह शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत शिरपूर तालुक्यातून कोट्यवधी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईने गांजा शेतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे वन जमिनीवरच गांजा शेती फुलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी या भागात गस्त घालून गांजा शेतीवर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून कुठलीही कारवाई न झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी कसुरी अहवाल वनविभागाच्या वरीष्ठांना सादर करण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 27 रोजी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांना शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील रेकलीयापाणी धरण परीसरात मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणार्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे झाडांची अवैधरित्या लागवड केल्याची व सुका गांजा बेकायदेशीर विक्री करण्याचया उद्देशाने लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश गुन्हे शाखा निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने मंगळवारी पहाटे छापा टाकत रेकलीयापाणी धरणाच्या वाहते पाण्याच्या बाजुस व कोरड्या भागात वेगवेगळया तीन ठिकाणी, अंदाजे 2 ते 3 एकर परीसरात अंदाजे 5/7 फुट कमी अधिक उंचीचे गांजाची झाडे दिसून आली तर धरणाच्या कडेला अंदाजे 100 ते 120 किलोपर्यंत सुका गांजा मिळाल्याने तो जप्त करण्यात आला. घटनास्थळी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, जितेंद्र वाघ, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, हवालदार सागर ठाकुर, ग्यानसिंग पावरा, होमगार्ड रवींद्र पावरा, महेंद्र माळी, सुनील पावरा व सुनील हरीदास पावरा आदींच्या पथकाने केली.