जळगाव मिरर | ८ नोव्हेंबर २०२४
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला जळगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सत्रात जळगावच्या भास्कर मार्केट आणि पोलीस लाईन परिसरात जयश्री महाजन यांच्या प्रचार मोर्चाने जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. या परिसरातील नागरिकांनी जयश्रीताईंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत त्यांना भरभरून पाठिंबा दिला.
प्रचार सभेत महाविकास आघाडीचे नेते, स्थानिक कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या जोशात आणि जोमात रस्ते गजबजून गेले होते, आणि “जयश्रीताई आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा परिसरात घुमू लागल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाच्या कर्तृत्वाची चर्चा करत त्यांच्या समाजसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
दरम्यान महिलांनी जयश्री महाजन यांचे औक्षण केले, फुलांचा वर्षाव करत त्यांना आशिर्वाद दिला आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावत “जयश्री महाजन विजयी असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महिला वर्गाचा हा पाठिंबा जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे द्योतक मानला जात आहे.
या प्रचाराच्या निमित्ताने जळगावातील विविध समाजघटक जयश्री महाजन यांना साथ देण्यासाठी एकवटले आहेत. जयश्रीताईंच्या नेतृत्वाखाली जळगावच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.