
जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६
छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती नागेश्वरवाडी परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास एका तरुणाकडून एका तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने ओढत नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 31 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांच्या सुमारास घडला. परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. त्या वेळी रस्त्यावर कोणतीही वर्दळ नसताना सुमारे 10 ते 15 मिनिटे हा प्रकार सुरू होता. संबंधित व्हिडीओमध्ये तरुणी स्वतःची सुटका करण्यासाठी वारंवार प्रतिकार करत असल्याचे स्पष्ट दिसते.
दरम्यान, एका जागरूक नागरिकाने आपल्या घराच्या खिडकीतून आवाज दिल्यानंतर हे दोघे घटनास्थळावरून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. मात्र, एवढा वेळ हा प्रकार सुरू असतानाही कोणाकडूनही तत्काळ मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित तरुण-तरुणी कोण होते, त्यांच्यातील नातेसंबंध काय होते, पहाटेच्या सुमारास ते रस्त्यावर का होते, तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत एवढा गंभीर प्रकार घडूनही तात्काळ कारवाई का झाली नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही. व्हायरल व्हिडीओ माध्यमांकडून पोलिसांकडे पाठवण्यात आला असला तरी, पोलिसांनी स्वतःहून दखल घेतल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनीही महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.






















