
जळगाव मिरर | २० मे २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. जातीयवादी लोकांना पुन्हा पदं देऊन अजित पवार मोठी चूक करत आहेत, असा थेट आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ यांना सध्या मंत्रिपदाचा आनंद वाटत असेल, पण लवकरच त्यावर विरजण पडेल. त्यांना ही संधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपुरती दिली आहे. छगन भुजबळ यांनी शपथ घेतली की नाही, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. हे त्यांचा पक्ष आणि अंतर्गत राजकारण आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील मराठा मुलांना या आरक्षणामुळे नोकरी लागणार आहे, शिक्षण मिळणार आहे. नेमक्या त्याच सुविधा मिळू नये यासाठी भुजबळ नेहमी विरोध करतात. जातीयवादी लोक पोसायचा प्रकार नेमका काय आहे? त्यांना मोठ्या परिणामांना आता सामोरे जावे लागणार आहे. भुजबळांना मंत्रिपद दिले म्हणून आम्ही म्हणत नाही. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम केवळ अजित पवार करत आहेत.
मनोज जरांगे म्हणाले की, हे सर्व नाटकं देवेंद्र फडणवीस यांचे आहे. छगन भुजबळांना मंत्रीपद द्या असे त्यांनीच सांगितले असेल. ओबीसी मतदानासाठी ही शाळा असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना ओएसडी दिले आहेत, यांचे काहीच चालत नाही.मराठा नेते संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. हे सर्व आमदारांना कळायला हवे. मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आल्या आहेत म्हणून अजित पवारांनी छगन भुजगळांना तात्पुरतं नादी लावले असेल असे मला वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी जर अजित पवारांकडून सत्तेत जाणीवपूर्वक घेतले जाणार असतील तर मराठ्यांना एकत्र राहण्याची गरज आहे.





















