
जळगाव मिरर | १९ मार्च २०२५
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ वातावरण तापले असतांना आता भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. रावसाहेब दानवेंच्या या विधानामुळे आता पुन्हा वेगळाच राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील हिंसाचारावरून महाविकास आघाडीतील पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या विधानामुळे नागपूरमधील घटना घडली असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर भाजपकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशात नागपूरमधील घटनेला काँग्रेसच जबाबदार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, नागपूरमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या काँग्रेसच जबाबदार आहे. कारण, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची तुलना थेट औरंगजेबासोबत केली होती. हर्षवर्धन सपकाळ यांचे हे वक्तव्य चुकीचे असून त्यांच्या या वक्तव्यामुळेच नागपूरची घटना घडल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. नागपूरच्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाही पाहिजे, असेही दानवे म्हणालेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी फारकत घेताना दिसले. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ऐकले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस असो कि आणखी कोणी असो, कोणाची अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.