
जळगाव मिरर | ५ जून २०२६

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव जवळील गोजोरे रस्त्यावरील सुदर्शन पेपर मिलमध्ये कार्यरत असलेल्या एका परप्रांतीय कंत्राटी कामगाराचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन पेपर मिलमध्ये विविध राज्यातील कंत्राटी कामगार आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी उत्तर प्रदेशातील बांदा येथील रहिवासी राजूभय्या (वय ४४, पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे कुटुंबासह राहून मिलमध्ये काम करत होते. ३ जूनला रात्री ते ४ जूनच्या पहाटे दरम्यान राजूभय्या हे घराबाहेर वाळूवर चटई टाकून झोपले होते. सकाळी बराच वेळ होऊनही ते न उठल्याने सहकारी कामगारांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा बोलावली. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. मृतदेहाचे भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर शववाहिकेद्वारे मृतदेह मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पाठवण्यात आला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पो.नि. महेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय कंखरे, हेडकॉन्स्टेबल धिरज मंडलिक, पो.पा. खुशाल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. तपास पो.हे.कॉ. धिरज मंडलिक करत आहेत.




















