जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२४
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु झाली असून त्यापूर्वी सरकार अनेक योजनांची घोषणा करीत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एका अभियाणाची घोषणा केली आहे.
येत्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने 18 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. लाडकी बहिण योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे हे अभियान असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
एकीकडे राजकीयदृष्ट्या सध्या या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात कोण लाडका भाऊ ? अशी काहीशी स्पर्धा पहायला मिळत असल्याचे चित्र असून, विरोधकांनी सातत्याने टीका चालवली आहे. दुसरीकडे भाजप आणि महायुतीने या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे ठरविले आहे. स्त्री सक्षमीकरण हा ध्यास घेऊन केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील महायुती सरकार व विशेषतः भारतीय जनता पार्टी अहोरात्र मेहनत घेत आहे. विविध योजना व उपक्रमांच्या द्वारे स्त्रीला सशक्त करण्याचे काम पक्ष व सरकारद्वारे आम्ही करत आहोत.
येत्या राखी पौर्णिमेला 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस “लाडक्या बहिणींचा देवाभाऊ” या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व माता – भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच, माझी भाजपा कार्यकर्त्यांना विशेषतः भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की, या उपक्रमाची जबाबदारी घेऊन आपण जास्तीत जास्त महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे असे आवाहन या निमित्ताने बावनकुळे यांनी केले.