जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२४
गेल्या काही महिन्यापासून देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाबरी मशीद पतनाच्या श्रेयवादावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप सुरु असतांना फडणवीस यांनी कारसेवा केली होती, या दाव्याची ठाकरे गटाने खिल्ली उडवली होती. मात्र आता फडणवीस यांनी कार सेवा करतानाचा फोटो शेअर केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो शेअर करत कारसेवेला गेल्याचा पुरावाच दिला आहे. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाट उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते. त्यावेळची ही आठवण आहे. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. त्या गर्दीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे.
फडणवीसांचे ट्विट काय?
जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.