जळगाव मिरर | २६ जुलै २०२३
जळगाव जिल्ह्यातील कारागृह नेहमी या-ना त्या कारणाने चर्चेत येत असते आज पुन्हा एका संतापजनक घटनेने जिल्हा कारागृह चर्चेत आले आहे. या कारागृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ब्यारेकमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका बंदीवर चार जणांनी अनैसर्गिक कृत्य करून या कृत्याचे वाचता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले असून त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या कैद्यांना देखील ठेवले होते. दि.१२ रोजी त्या कैद्याला बाथरुममध्ये घेवून जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुला बघुन घेईल जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवित अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वार झाल्याने जखमी झालेला बंदी जमिनीवर कोसळल्यानंतर कैद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन तो गळ्याला कापड बांधून झोपून गेला. या घटनेबाबत कारागृहातील बंदीने त्या जखमी बंदीची विचारपुस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत त्याला सांगितला. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी बंदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये ठेवले.
दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवल्यानंतर देखील अत्याचार करणारे बंदी त्याच्याजवळ येवून त्याला अधूनमधून धमकी देत होते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून त्या बंद्याने घडलेली घटना दि. २० जुलै रोजी कारागृहातील अधिकाऱ्यांसमोर कथन केली. त्यांनी लागलीच बंद्याची वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात रवाना केले. त्याच्यावर उपचार करण्यात आले. दमदाटी करुन अनैसर्गिक कृत्य करणारा कारागृहातील बंदी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ याच्यासह त्याचे मित्र लोखंडी पट्टीने वार करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.