जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२४
राज्यातील काही शहरातील गुन्हेगारी दिवसेदिवस मोठय प्रमाणात वाढत असतांना नुकतेच नाशिक शहरातील अंबड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयितास पोलिसांनी एका तासात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरात कामाटवाडा परिसरात राहणारे आनंद इंगळे आणि आनंद आंबेकर हे लहानपणापासूनचे मित्र होते. दोघे शाळेतही बरोबर होते तर मोठे झाल्यावर बिगारी कामदेखील सोबत करायचे. काल रात्री दोघेही दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी दारूच्या नशेत आनंद इंगळे याने आनंद आंबेकरच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले. यावरुन दोन्ही मित्रांमध्ये जोरदार वाद होऊन रस्त्यावरच भांडण सुरू झाले. याच भांडणातून आनंद आंबेकर याने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप वाघ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नाहीद शेख सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपी आनंद आंबेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.