जळगाव मिरर | १६ जुलै २०२३
राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकार गेल्या आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी धुळ्यात येवून गेले पण शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात रस्तेच नसल्याने ॲम्बुलन्स पोहोचू शकत नाही. यामुळे गर्भवती महिलेला तब्बल तीन किमीपर्यंत बांबूंच्या साहाय्याने केलेल्या झोळीमधून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
एकीकडे राज्य सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोहोचून शासन कशा पद्धतीने नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून सेवा देत आहे. याचा गवगवा करत असताना दुसरीकडे हे धक्कादायक वास्तव उघडकीस आल्याने राज्य सरकारचं पुन्हा एकदा पितळ उघड पडल आहे. राज्य सरकार फक्त शहरी भागांमध्येच आपला विकास दाखवत असल्याचं या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, राज्य सरकारने या अतिदुर्गम भागांमध्ये देखील विकासकामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शिरपूर तालुक्यातील मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या अतिदुर्गम निशाणपाणी ते थुवाणपाणी व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी या गावांना डांबरी रस्ताच नसल्याने येथे रुग्णवाहिका पोहोचत नाही. यामुळे सदर गर्भवती महिलेला निशाणपाणी ते थुवाणपाणी ३ किलोमीटर व थुवाणपाणी ते गुऱ्हाळपाणी ३ किलोमीटर असे एकूण ६ किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करावा लागला आहे. त्यानंतर तेथून या महिलेला गुऱ्हाळपाणी येथून अंबुलन्सने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या महिलेची सुरक्षितरित्या डिलीव्हरी झाली असून बाळ व महिलेची प्रकृती सध्या ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.