जळगाव मिरर | १६ जून २०२५
शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून दि.१५ रोजी दुपारी ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कोंगानगर येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून चौकशी केली व नातेवाईक ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच पंचनामे व इतर प्रशासकीय बाबी तात्काळ पूर्ण करून सदर मयतांच्या वारसांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, संदेश निकुंभ उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लखन दिलीप पवार (वय १४) रा. कोंगानगर, दशरथ उदल पवार (वय २४) रा. कोंगानगर, समाधान प्रकाश राठोड (वय ९) रा. जेहूर ता कन्नड जि. औरंगाबाद व दिलीप उदल पवार (वय ३५) रा. कोंगानगर ता चाळीसगाव हे दि.१५ रोजी कोंगानगर शिवारातील शेतात दुपारी शेती काम करीत होते. अचानक वीज पडल्याने यातील लखन दिलीप पवार (वय१४) रा कोंगानगर, दशरथ उदल पवार रा. कोंगानगर, समाधान प्रकाश राठोड रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांचा मृत्यू झाला तर, तेथेच काम करीत असलेले दिलीप उदल पवार रा. कोंगानगर ता चाळीसगाव हे जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर तिघांचे मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व जखमीवर उपचार करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेवून मयतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेने मयतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलिस करत आहेत.
