
जळगाव मिरर | १३ जून २०२६

शहरातील फुले मार्केट परिसरातील दोन व्यावसायिकांवर बालकामगारांना कामावर ठेवून त्यांच्याकडून श्रमाचे काम करून घेतल्याप्रकरणी बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुले मार्केटमधील ओम हँडलूम तसेच बीएचआर गारमेंट्स या दुकानांमध्ये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान या मुलांकडून श्रमाचे काम करून घेतले जात असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून ओम हँडलूमचे मालक सुमीत कुकरेजा (वय ३६) तसेच बीएचआर गारमेंट्सचे मालक विनोद वालेचा (वय ४४) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात बालकामगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालकामगारांना रोजगार देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील विविध व्यावसायिक आस्थापनांची तपासणी सुरू असून भविष्यातही अशी मोहीम कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण वाघ करीत आहेत.



















