
जळगाव मिरर | १५ जून २०२६

खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय स्वागत करण्यात आले. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळा प्रवेश उत्सवा’त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना, “शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही आनंदाचा उत्सव असतो,” असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपुष्प देऊन तसेच आकर्षक सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

संस्थेचे माजी अध्यक्ष मा. श्री. मेजर नानासाहेब वाणी, विद्यमान अध्यक्ष मा. श्री. प्रमोदभाऊ चांदसरकर, उपाध्यक्ष श्रीमती सीमाताई चांदसरकर तसेच संचालिका सौ. सुप्रियाताई चांदसरकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शाळा समितीच्या संचालिका सौ. सुप्रियाताई चांदसरकर, मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे, पालक प्रतिनिधी सौ. प्रीती तायडे आणि श्री. मनोज चंडाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून प्रेमाचा निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. पूनम पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. श्याम ठाकरे, श्रीमती जयश्री पाटील, श्री. स्वप्निल भोकरे, श्री. महेश तायडे, सौ. पूनम पाटील, सौ. दीपिका सोनवणे, सौ. रोहिणी निकम, सौ. मनीषा वाघ, सौ. उज्वला भामरे, सौ. प्रिया कोपरकर आणि श्री. भूषण अमृतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.




















