जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केल्याने विरोधकांनी सरकारवर चांगलीच टीका केली होती. आता चक्क भाजपचे दिग्गज नेते मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेमुळे उद्योजकांचा सबसिडीचा पैसा खोळंबल्याची टीका करीत भाजप, शिवसेना महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सातत्याने श्रेय घेण्याचा, महिला मेळाव्यातून भांडवल करण्याचा प्रयत्न करत असताना नितीन गडकरी यांनी दिलेल्या घरच्या आहेरामुळे आता विरोधक कुठली भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हॉटेल अशोक येथे झालेल्या वेदच्या कार्यक्रमात उद्योजकांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले. सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सरकार म्हणजे विषकन्या आहे. त्यांच्या मागे फार काळ लागू नका असा सल्ला देतानाच गडकरी यांनी सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने उद्योजकांचे सबसिडीचे पैसे वळवले.
माझ्या मुलाने मला प्रश्न केला, साडेचारशे कोटी रुपये सबसिडीचे खोळंबल्याची माहिती दिली, असे सांगत त्यांनी या योजनेसाठी सबसिडीचा पैसा द्यावा लागतोय, हे वास्तव पुढे आणले. गडकरी यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधक या संदर्भात कुठली भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेले काही दिवस सातत्याने स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गडकरी सरकारला घेरत आहेत हे विशेष.