जळगाव : प्रतिनिधी
येथील मेहरुण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाला भावपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप देण्यात आला. यावेळी अनेक लहान बालकांचे डोळे पाणावले होते तर काहींनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयमध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. अखेरच्या दिवशी गणेश विसर्जनाला भावपूर्ण वातावरणात पर्यावरण पूरक पद्धतीने निरोप देण्यात आला. यावेळी श्री गणेशाची आरती संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक व स्वाती नाईक यांच्या हस्ते करण्यात आली.
यानंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी ठेका धरीत श्री गणेशाचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या मुलांच्या जयघोषांमध्ये कृत्रिम टबामध्ये विधिवत श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अनेक लहान मुलांनी अश्रूंना मोकळी वाट करून देत वातावरण भावपूर्ण केले.
मुख्याध्यापिका शितल कोळी, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाठ, दिनेश पाटील, साक्षी जोगी, रूपाली आव्हाड, आम्रपाली शिरसाट, दिव्या पाटील, सोनाली जाधव, सोनाली चौधरी, पूनम निकम, कोमल पाटील, नयना अडकमोल, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.