जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरातील शासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून नुकतेच धुळे शहरात शिक्षक दांपत्याकडून दोन लाखाची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी विभाग तसेच भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधीक्षिकेला लाच लुचपतने मंगळवारी (दि.२०) अटक केली. मीनाक्षी भाऊराव गिरी असे या अधीक्षिकेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तकारदार व त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका हायस्कूल येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर होऊन शिक्षण संचालक यांनी थकीत वेतन धुळे येथील अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु हे थकीत वेतन तकारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी अधीक्षिका श्रीमती मिनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली होती. परंतु त्यांनी वेगवेगळ्या कारणाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीला त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही.
त्यांनतर सुमारे १५ ते २० दिवसापुर्वी तक्रारदार यांनी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली व थकीत वेतन अदा करण्यासाठी त्यांना विनंती केली. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाखाच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपतच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन लाखाची लाच स्विकारताना सापळा रचून लाचलुचपतने गिरी यांना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली.