जळगाव मिरर / १ एप्रिल २०२३ ।
राज्यातील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘तेरा भी मुसेवाला कर दूंगा’ असा मेसेज केल्याचा दावा करण्यात आला आहे. संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा गुंडांच्या मदतीने मला धमकी देतो. याबाबत मी गृहमंत्र्यांना माहिती दिली तर ते म्हणतात हा स्टंट आहे. मग त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) घरात होतो तो स्टंट नाही आहे का?. त्यासाठी तुम्ही एसआयटी तयार करता. लोकांना पकडून आणता. हा तर सर्वात मोठा स्टंट आहे. खर काय आहे हे मला माहित आहे. मात्र मला मर्यादा राखायची आहे.
या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलताना म्हणाले की, “संजय राऊत यांना आलेली धमकी देणारा माणूस पकडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारूच्या नशेत त्या व्यक्तीने संजय राऊत यांना धमकी दिली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. धमकी देणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कोणी कोणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार आणि पोलिस शांत बसणार नाहीत” असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तर पुढे ते म्हणाले की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. हे मला माहीत आहे. मी गृहमंत्री राहिलो नाही तर बर होईल असं त्यांना वाटत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो कि, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चार्ज दिला आहे. जे लोक चुकीच काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही मी त्यांना सोडणार नाही असंही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.