जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४
कार्यालयीन कामकाजानिमित्त विद्यापीठात जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्य वाहनाला मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या काँक्रीट मिक्सरच्या वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कुणाल राजेंद्र महाले (वय २५, रा. नहाटा नगर, भुसावळ) या क्लार्कचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला तरुण जखमी झाला. ही घटना बुधवार दि. २५ रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जकात नाक्याजवळ घडली. यावेळी मयताच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील नहाटा नगरात कुणाल महाले हा तरुण आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. काही महिन्यांपुर्वीच तो भुसावळ येथील के नारखेडे महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने क्लर्क म्हणून नोकरीला लागला होता. बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी तो महाविद्यालयाच्या कामानिमित्त बांभोरी येथील कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्याचे सहकारी निखील शरद बऱ्हाटे याच्यासोबत जाण्यासाठी निघाला. साडे अकरा वाजेच्या सुमारास ते बांभोरीजवळील जकातनाक्याजवळ पोहचले. यावेळी जळगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंटू काँक्रीटच्या मिक्सरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. यावेळी मागून येणाऱ्या काँक्रीटच्या मिक्सरखाली येवून कुणालचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी निखील बऱ्हाटे हा किरकोळ जखमी झाला.
अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्यातील अनिल फेगडे यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत धडक देणारा काँक्रीट मिस्कर चालक तेथून पसार झाला होता. दरम्यान, जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी कुणाल महाले याची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले.
अपघातात कुणाल महाले हा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. काही वेळानंतर गंभीर जखमी झालेल्या कुणालचा मृत्यू झाल्याचे कळताच तो काम करीत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक देखील रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात हृदयपिळवून टाकणारा आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.