जळगाव मिरर | १ मार्च २०२४
राज्यातील अनेक धक्कादायक घटना या प्रेम प्रकरणातून होत असतात अशीच एक संतापजनक घटना सातारा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चक्क आई वडिलांनी घरात तीन लहान मुली असताना दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू होते. मुलींच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता एक दिवस दोघेही घर सोडून आपापल्या प्रियकर, प्रेयसीसोबत निघून गेले. घरमालक, समाजसेवकांनी मुलींचा सांभाळ केला. मागील अडीच महिन्यांपासून आई- वडिलांच्या प्रतीक्षेत डोळ्यातील मुलींच्या अश्रू क्षणभरही थांबले नाहीत.
मात्र, निष्ठर आई- वडिलांना पोटच्या लेकरांविषयी पाझर फुटला नाही. अखेर, बाल कल्याण समितीला हा प्रकार कळाल्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात आई- वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा परिसरात ही हृदयद्रावक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. राखी व संतोष (नावे बदललेली) हे जोडपे काही महिन्यांपासून सातारा परिसरात किरायाने राहत होते. त्यांना अनुक्रमे ११, ८ व ७ वर्षांच्या तीन मुली आहेत. सुरुवातीचे काही दिवस चांगले वाटलेल्या जोडप्याच्या वागण्यात काही दिवसांमध्येच बदल घडला. मुलींकडे त्यांचे दुर्लक्ष असायचे. अनेकदा ते त्यांना नाहक मारहाण करायचे. डिसेंबर महिन्यात मायबाप बेपत्ता झाले. मुलींसाठी परत येतील, म्हणून घरमालकाने काही दिवस मुलींचा सांभाळ केला. मात्र, आजतागायत ते परतलेच नाहीत.